Sunday, 31 May 2015
चित्रलेखा मासिकातील प्रियदर्शनी सदरातील लेख
खेळघराची निर्माती शोभा भागवतदि.1 मार्च 2015मुलांच्या गराड्यात बसलेल्या शोभाताई हे दृष्य पुण्याच्या बालभवनमध्ये कायम दिसतं. खेळणारी, बागडणारी आणि विशेष म्हणजे, मनसोक्त दंगा करणारी मुलं हे बालभवनचं वैभव आहे. हे वैभव आकाराला आणलं आहे शोभा भागवत यांनी ! बालमानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या शोभा भागवत यांनी मुलांचं मन ओळखून या बालभवनाला मुलांचं खेळघर बनवलं आहे.शोभाताई सांगतात, 1985मध्ये बालभवन सुरु झालं, तेव्हा माझ्या मनात काही गोष्टी स्पष्ट होत्या. शाळेनंतर इथे मुलं येणार तेव्हा ती दमून येणार. त्यामुळे त्यांना उत्साह वाटेल असंच काही इथे घडलं पाहिजे. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. तीन ते बारा वर्षे या वयोगटातल्या मुलांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी शाळेखेरीज एक पर्यायी जागा असावी, या विचाराने पुणे महानगरपालिका आणि गरवारे ट्रस्ट यांनी संयुक्तरित्या हे बालभवन सुरु केलं. डॉ.श्यामला वनारसे या बालभवनच्या प्रमुख सल्लागार होत्या. त्यांनीच बालभवनच्या व्यवस्थापक म्हणून शोभा भागवत यांची निवड केली. आजही शोभा भागवत ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. आज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत शोभा भागवत यांची ओळख शोभाताईं म्हणूनच झालेली आहे. शोभाताई या नावाभोवतीचं वलय किती मोठं आहे, याची कल्पना त्यांच्या एकंदर कार्याचा आढावा घेतल्यानंतरच येते. शोभाताई मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली या गावात राहणा-या रहिवासी. व्यवसायानिमित्त वडिलांनी ठाणे गाठले. त्या म्हणतात, लहान मुलांवरच्या संवेदनक्षमतेला कसं विकसित करायचं हे मी माझ्या वडिलांकडून शिकले. छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांचा बौध्दिक, भावनिक विकास कसा करायला हवा, हे मी त्यांच्याकडून शिकले. लग्न झाल्यावर मी पुण्यात आले. लग्नानंतरची काही वर्ष अमेरिकेत राहिले. पती अनिल भागवत यांच्यासोबत अनेक देशोदेशीच्या ठिकाणांना अभ्यासपूर्ण भेटी दिल्या. पुण्यात आल्यावर शिक्षण संशोधन क्षेत्रात दोन वर्ष काम केलं. त्यानंतर स्त्रीवाणी संस्थेअंतर्गत दलित स्त्रीयांच्या जाणिवा या विषयावरही काम पाहिलं. श्यामलाताईंसोबत काही काळ काम करत असल्यामुळे बालभवनची जबाबदारी मोठ्या विश्वासाने श्यामलाताईंनी शोभाताईंवर सोपवली. शोभाताईं बालभवनचा आलेख सांगताना म्हणतात, “स्पर्धेच्या धावत्या जीवनाची गाडी पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पालकांना आपल्या मुलांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने नेमकी कोणती आणि कशी पावलं उचलावी तेच कळत नाही. पालक म्हणतात विचार सांगू नका नेमकं काय करायचं ते सांगा. नेमकं काय करायचं तर बालभवनसारख्या उपक्रमात सहभागी व्हायचं, हाच मार्ग त्यांना दाखवावा लागतो. नेमकी हीच गरज पालकांना होती. त्यामुळे बालभवनच्या सुरुवातीच्याच पहिल्या बॅचमध्ये 200 मुलांचा सहभाग होता. त्यानंतर लगेचच तो आकडा 1200वर गेला.” बालविकासाला उपयुक्त अशा सहज, खेळताखेळता आपल्या क्षमता ओळखायला मदत करणा-या अनेक देशोदेशीच्या कल्पना शोभाताईंनी खेळ, विविध उपक्रमाच्या माध्यमातून बालभवनात कार्यान्वित केल्या. व्याक्तिगत आणि सामाजिक जीवनात मन रमवणारी इतरांचा विचार करणारी एकलकोंडी-एककल्ली मुलं बघता बघता घडत गेली. व्यायाम, वाचन, खेळ, चित्रकला, हस्तकला, नृत्य, अभिनय, सहली, शिबिरं, स्नेहसंमेलन या गोष्टींच्या माध्यमातून एक वेगळंच जग मुलांसमोर उलगडत होतं. शोभाताई म्हणतात, “अभ्यासक्रमाच्या अशा काही चौकटी आम्ही आखल्या नव्हत्या. आमचा असा काही साचा ठरलेलला नसतो. प्रत्येक ताई आपापल्या प्रतिभेनुसार खेळ तयार करत असते, ते मुलांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे सातत्याने नाविण्य जपण्याची भुमिका आपोआपच पार पाडली जाते. कुणी नव्या प्रकाराने गाणी शिकवली, आनंद वाटेल असा व्यायाम प्रकार शोधला, कुणी मुलांचे कौशल्यपणाला लावेल असे काही खेळ शोधले, हेही आमच्या तायांकडून होत असते. त्यामुळे दिवसेंदिवस बालभवनची प्रवेश प्रक्रियेला वेटींग लिस्टसारखं स्वरुप आलंय. बालभवनात दरवर्षी किमान दोन हजार मुलं प्रवेश घेत असतात. ” मुलांच्या आठवणी सांगताना शोभाताई त्या आठवणीतच हरवून जातात. “आमच्याकडे एक खूप वात्रट मुलगा होता. तो काही केल्या कुणाचंच ऐकायचा नाही. अभ्यास करायचा नाही. दंगामस्ती नुसती चालायची त्याची. बारावीनंतर तर त्याने चक्कं शाळाच सोडून दिली. शिकायचंच नाही म्हणून हटून बसला. घरचं सगळं व्यवस्थित होतं. तसं म्हटलं तर सुसंकृत, सुशिक्षीत त्याचं घराणं. एक काय ती त्याची कला होती, ती म्हणजे फोटोग्राफी. इथे बालभवनातही खूप छान छान फोटो काढायचा तो. त्याला व्हायचं होतं सिनेमेटोग्राफर. त्याला भारताच्या कुठल्याच विद्यापिठात त्यासाठी प्रवेश मिळाला नाही. शेवटी अमेरिकेत जाऊन त्यानं हा अभ्यासक्रम पूर्ण केला. फोटोग्राफी, फिल्मच्या निमित्ताने तो हिमालयातसुध्दा जाऊन यायचा. हिमालयाच्या लगत असलेल्या छोट्याश्या गावात काही मुलांना शिक्षणासाठी प्रेरीत करण्याचा विडा उचलला. आई-वडिलांना फोन करून कऴवलं मी आता काही सात आठ महिने घरी येत नाही. त्या गावात सात-आठ मुलांना जमवून त्यांच्या शिक्षणापासून ही मुलं वंचित राहू नयेत तो स्वतः तिथं थांबला. त्यासाठी स्वतः मेहनत घेतली. त्यांच्यासाठी शाळा उभी केली. आता त्याच्या शाळेत पाचशेएक विद्यार्थी आहेत. आता तो सहा महिने इथे सहा महिने आपल्या शाळेच्यावातावरणात असतो. हीच तर बालभवनची संपत्ती आहे,” असं आर्वजून शोभाताई सांगतात.
आजवर शोभाताईं अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्यामध्ये शतायुषी आरोग्य शिक्षण व
संवर्धन पुरस्कार, रमाबाई औटा प्रतिष्ठानचा बालविकास विशेष पुरस्कार,
आदिशक्ती पुरस्कार, वंचित विकास पुरस्कार ,ज्ञानदेवी पुरस्कार, महाराष्ट्र पालक शिक्षक संघ
पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. बालभवन उपक्रमालाही अनेक पुरस्कार मिळाले
आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment